अध्याय ३१ – ग्रंथ सारणिका

सत मुनी शौनकादिक ऋषींना म्हणाले, “नारायणांनी नारदाला ‘अधिकमास माहात्म्या’च्या अनेक कथा सांगितल्या. काही कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितल्या. श्रीकृष्णाने पांडवांना “अधिकमास माहात्म्य’ सांगितले. त्या सर्व कथा व्यासांनी लिहून ठेवल्या. ते बृहन्नारदीय पुराण, पद्मपुराण यातील कथा मी तुम्हांला सांगितल्या त्या ‘अधिकमास माहात्म्य’ ग्रंथाची थोडक्यात माहिती म्हणजे सारणिका अशी आहे

पहिल्या अध्यायात मंगला चरणानंतर नारदाने नारायणाला विचारले, “तुम्ही कोणाचे ध्यान चिंतन करता?” मग नारायणांनी पुरुषोत्तम आणि गोलोकाची माहिती त्याला दिली. काम्यकवनात पांडवांना श्रीकृष्ण भेटले.

दुसऱ्या अध्यायात मलमास वैकुंठाला गेला. भगवान विष्णूंनी त्याला गोलोकात भगवान पुरुषोत्तमाच्या चरणी घातला. तिसऱ्या अध्यायात भगवान पुरुषोत्तमांनी त्या अमंगल मलमासाला स्वतःचे नाव देऊन पुण्यकर्मासाठी त्याला पावन केले. त्याला सर्व महिन्यात श्रेष्ठ असे पद दिले.

चवथ्या अध्यायात आणि पाचव्या अध्यायात धर्मराजाला

श्रीकृष्णाने द्रौपदीचे पूर्वजन्मीचे अपराध सांगून अधिकमासातील व्रते, दाने, नियम सांगितले.

सहा, सात आणि आठव्या अध्यायात वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला त्याच्या पूर्वजन्मातील सुदेवाची कथा सांगितली. नवव्या अध्यायात अधिकमासात करायची व्रते, दाने, नियम यांची माहिती आणि त्या भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेचा विधी यांचे वर्णन आहे.

दहाव्या अध्यायात- गोपूजन आणि गोदान यांचे महत्त्व. अकराव्यात विप्रपूजा आणि नृगराजाची कथा. बाराव्यात स्नान महिमा आणि दीप प्रज्वलनाचे पुण्य याची कथा. तेराव्यात विमलेने दिव्याचे अपराध करुन सवतीच्या दीपपूजेत केलेल्या अडथळ्यांची कथा. चौदाव्या आणि पंधराव्या अध्यायात दीप माहात्म्य आणि मणिग्रीवाची कथा सांगितली आहे.

सोळाव्या अध्यायात- भगवंताच्या नामाचा महिमा, अन्नदान आणि उपवास यांची फळे यथासांग सांगितली. सतराव्यातमौनभोजन व्रत. अठराव्यात पंचपर्वांपैकी वैधृती, पौर्णिमा आणि व्यतिपात या पर्वांचे महत्त्व सांगून एकोणाविसाव्यात द्वादशी पर्वाचे आणि दर्श-अमावास्या पर्वाचे महत्त्व वर्णन केले. विसाव्या अध्यायात स्मितविलासिनी ह्या अप्सरेच्या शापविमोचनाची कथा आहे.

एकविसाव्यात स्नान महिमा आणि बाविसाव्यात स्नान पुण्याईने दान करुन सातशे भुते आणि राक्षस यांचा जो उद्धार विप्रदास आणि सोमशर्मा यांनी केला ती कथा दिली आहे. तेविसाव्या अध्यायात एकांतरोपवास- धरणे पारणेचे व्रत. चोविसाव्यात विप्रसेवा तसेच, अनेकविध दाने आणि मेनादेवीपूजा यांच्या कथा सांगून पंचविसाव्यात वीरबाहू राजाची कथा वर्णन केली आहे.

सव्विसाव्या अध्यायात अधिकमास व्रताचे उद्यापन. सत्ताविसाव्यात गृहित नियमांचा त्याग-काय करावे काय काय करू नये ते सांगून अठ्ठाविसाव्यात सुमती राजाचे आख्यान दिले आहे.एकोणतीस आणि तीस या अध्यायात कंजुष कदर्याची कथा आणि वानराचा उद्धार ही कथा सविस्तर सांगितली आहे! – शौनकादिक ऋषींना सूत मुनींनी अशाप्रकारे लोक-कल्याणासाठी अधिकमास माहात्म्य कथासाराची या एकतिसाव्या अध्यायात सारणिका सांगून त्यांचे समाधान केले. त्यानंतर ‘अधिकमास माहात्म्य’ ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण जे लोक करतील त्यांना पुण्यप्राप्तीचे आशिर्वाद दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *