अध्याय २३ – काशीतील दोन देवता
विंध्य पर्वताच्या अमरकंटक नावाच्या एका भागात प्रत्यक्ष शिवशंकरांच्या हातातून एका नदीचा उगम झाला आहे. त्या नदीचे नाव नर्मदा. या नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मनुष्यांना मोठे पुण्य लाभते. या नर्मदा नदीच्या उगमापासून म्हणजे अमरकंटक पर्वतापासून तो थेट तिच्या सागरसंगमापर्यंत म्हणजे भृगुकच्छ (भडोच)
क्षेत्रापर्यंतची परिक्रमा-प्रदक्षिणा अनेक लोक करतात. त्या अति 4 अवघड परिक्रमा पूर्ण केल्याने जीवनाचे सार्थक होते..
अशा त्या अतिपवित्र नर्मदेच्या तीरी भृगुकच्छ (भडोच) तीर्थक्षेत्रात प्रत्यक्ष भगवान शंकर पार्वतीसह निवास करतात. अनेक देवदेवांचाही तेथे निवास आहे. त्या देवाच्या नगरीत कुशलशर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहात होता.
कुशलशर्मा आणि कुशावती या जोडप्याला एक सुंदर मुलगी होती. तिचे नाव मेधावती. मेधावती उपवर झाल्यावर तिचे लग्न पद्मनाभ नावाच्या एका तरुणाशी झाले. मेधावतीचा संसार अगदी सुखाने सुरु झाला.
एके दिवशी तो तरुण पद्मनाभ नर्मदा नदीत स्नानासाठी गेला तोच हाय रे दैवा त्याला नदीतील एका मगरीने ओढले आणि ती त्याला घेऊन खूप दूरवर डोहात निघून गेली. पद्मनाभ बुडून मेला. त्याला मगरीने खाऊन टाकले.
ती वार्ता कळताच अनेक लोक नदीवर जमले. कुशलशर्मा, कुशावती आणि ती मेधावती यांच्या दुःखाला तर अंतच नव्हता; पण आता घटना घडून गेली होती. मृत्यूपुढे कोणाचा काहीच इलाज चालत नाही. लोकांनी त्या तिघांचे सांत्वन केले.
विधवा झालेली ती मेधावती सतत उदास राहायची. देवपूजा, नामजप, दानधर्म यातच आपला काळ कंठीत असायची. एकदा कुशलशर्मा तिला म्हणाला, “बाळे, आता अधिकमास येईल. त्यात तू धरणे पारणे व्रत कर. त्यायोगे तुला मनःशांती मिळेल. तुझे कल्याण होईल!” | पुढे अधिकमास आला. मेधावतीने पहाटेच उठून नर्मदा नदीत स्नान केले. शिवलिंगाची पूजा करून देवी-पार्वतीची प्रार्थना केली. नंतर तिने मातापित्यांना वंदन करू नर्मदा प्रदक्षिणा सुरू केली. तिच्याबरोबर काही भाविक लोक होते.
या अधिकमासात तिने एकांतरोपवास व्रत केले. म्हणजे एक दिवस संपर्ण उपवास करून दुसरे दिवशी एकभुक्त भोजन करायचे. हे धरणे पारणे व्रत तिने निष्ठेने केले. रोजचे नर्मदा स्नान, शिवपार्वतीपूजन, अमीपूजन वगैरे नियम महिनाभर तिने पाळले.
त्या खडतर दिनचर्येमुळे आणि त्या कडक व्रतनियम पाळण्यामुळे मेधावती खूपच अशक्त झाली आणि एके दिवशी ती शिवपार्वतीपूजा करीत असताना मरण पावली. तिचा आत्मा पार्वतीच्या रुपात विलीन झाला.
काशीनगरीत लोकांनी त्या मेधावतीला नंतर विशालाक्षी नावाची देवी करुन तिचे तेथे मंदिर बांधले. त्या देवतेच्या दर्शनाला अजूनही हजारो लोक जातात आणि तिचे पुण्यस्मरण करून पावन होतात.
भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, अधिकमासात ते एकांतरोपवासव्रत -धरणेपारणे- केल्यामुळे ती मेधावती मानव असून देवता बनली तशीच तिची एक मैत्रीणही त्या नक्तभोजन व्रताच्या पुण्याईने देवता स्वरुप झाली. ती कोमला नावाची मैत्रीण काशीनगरीत मंगलगौरी नावाची देवता झाली. तिचेही तेथे मंदिर आहे!”
काशीतील त्या दोन देवतांची कथा सांगितल्यावर विष्णूंनी लक्ष्मीला ब्राह्मणसेवा करणाऱ्या एका धनदास नावाच्या गृहस्थाचा आणि त्याची पत्नी मानवती हिचा उद्धार कसा झाला ती कथा थोडक्यात सांगितली.
पुढे चोविसाव्या अध्यायात पार्वतीमाता मेनका हिच्या पूजेचे, अधिकमासातील मेनाव्रताचे माहात्म जे का अतिविशेष आहे ते सांगितले आहे.
अधिकमास अध्याय वाचण्यासाठी click करा