अध्याय १८ – पंचपर्वांची माहिती
लक्ष्मी म्हणाली “देवा, मौन भोजनाचे महत्त्व मला पटले; पण अधिकमासातील अती पुण्यकारक अशी पंचपर्वे कोणती?” तिच्या त्या प्रश्नावर भगवान विष्णु म्हणाले, “हे मनोरमे, त्या पंचपर्वांची माहिती मी तुला थोडक्यात सांगतो!”
वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या आणि द्वादशी ही ती पाच पर्वे आहेत. प्रत्येक पर्वाचे महत्त्व आगळेच आहे. प्रथम वैधृती या पर्वाची माहिती पाहा
ज्या दिवशी अधिकमासातील वैधृती हे पर्व असेल त्यादिवशी स्नान, दान आणि होम ही कृत्ये यथाशक्ती करावीत. त्यामुळे मी- विष्णु प्रसन्न होऊन त्या भक्ताचे मनोरथ पुरवितो. कारण हे पर्व फारच पुण्यकारक आणि श्रेष्ठ आहे. – या पर्वणीत दूध, तूप, तीळ आणि फळे या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्यात. सोळा पाने, सोळा सुपाऱ्या यांचे विडे दान करावेत. विष्णसहस्त्रनामांचा उच्चार करावा.
या वैधृती पर्वात स्नान, दान, होम ही व्रते केल्यामुळे भक्त प्रल्हादाला इंद्रपद मिळाले. इंद्राची गेलेली संपत्ती त्याला परत मिळाली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
आता व्यतिपात या पर्वाची माहिती तुला सांगतो. व्यतिपात हा योग आला तर त्याचे फळ मोठे आहे. या दिवशी सोने किंवा धान्य दान करावे. ते पुण्य मोठे असते. तेरा या संख्येत नारळ, केळी, खजूर, द्राक्षे, आंबे, फणस इत्यादी जी फळे देता येतील ती पूजा करून दान द्यावीत. तीळ आणि एखादे ताट दान करावे.
दरमहा व्यतिपात योग असतो त्या दिवशीसुद्धा स्नान, दान केले
तर पुण्य लाभेलच; पण अधिकमासातील व्यतिपात पर्व त्या सर्वात जास्त फलदायी आहे! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “हे इंदिरे, आता तुला तिसरे पर्व म्हणजे पौर्णिमा या पर्वाची माहिती थोडक्यात सांगतो. अधिकमासात पौर्णिमेचे पर्व साधून स्नानदानादि पुण्य कृत्ये केली तर ब्रह्मदेव स्वतः प्रसन्न होतो.
अधिकमासातील स्नानाचे नियम पाळून अगदी पहाटे स्नान करावे.* नंतर इष्ट देवता, आराध्य देवता आणि भगवान पुरुषोत्तम यांची 4 विधीपूर्वक निष्ठेने पूजा करावी. या दिवशी सोने, जमीन किंवा धान्य, कपडा वगैरे मोलाचे दान सत्पात्री ब्राह्मणाला द्यावे. – वर्षातील बारा महिन्यांच्या बारा पौर्णिमा जशा देवकार्याविषयी प्रसिद्ध आहेत. त्याहीपेक्षा अधिक- मासाची ही तीन वर्षांनी येणारी तेरावी पौर्णिमा अधिक श्रेष्ठ आहे. चैत्री पौर्णिमेला- हनुमान जन्म, वैशाखी ज्येष्ठी पौर्णिमेला-वट सावित्री, यमपूजा, श्रावणी-रक्षाबंधन, आश्विनी-कोजागिरी, लक्ष्मीपूजन, कार्तिकी, त्रिपुरी-शिवपूजा, माघ पौर्णिमा- श्रीमोहिनीराज पूजा, फाल्गुनी- हुताशनी अशा पौर्णिमा महत्त्वाच्या. त्यापेक्षाही ही तेरावी अधिकमासातील पौर्णिमा भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेची फारच पुण्यकारक आहे.
आता अमावास्येचे गुण सांगतो. अमावास्या ही पितृतिथी आहे. बारा महिन्यातील अमावास्या तिथीला पुत्रांनी आपल्या पितरांना श्राद्धकर्मे करून संतुष्ट केले पाहिजे. पितृतिथीला श्राद्ध चूकून राहिलेच तर ते श्राद्ध भाद्रपदातील सर्वपित्री अमावास्येला करतात; पण अधिकमासातील ही तेरावी अमावास्या म्हणजे पंचपर्वातील विशेष असे पर्व आहे. या दिवशी स्नान करुन आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध तर्पण करून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, पात्रदान वगैरे दाने द्यावीत. देवपूजेपेक्षाही पितृपूजा अत्यंत श्रेष्ठ असते. आपले पितर जर असंतुष्ट राहिले तर त्या बाधेमुळे आपणावर अनेक संकटे येत असतात. म्हणूनच हे अमावास्या पर्व चुकवू नये.
अधिकमास महात्म्य अध्याय 19