life after death

मृत्यु म्हणजे ‘अवस्थांतर’ मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ?

मृत्यूचे नाव काढताच सर्वसामान्य मनुष्याच्या अंगावर भीतीने शहारे येतात ! कारण मृत्यु म्हणजे ‘सर्वस्वाचा शेवट’ अशीच त्याची चुकीची धारणा असते. नि म्हणूनच एखादा रोगग्रस्त किंवा अतिशय दुःखी माणूसही मृत्यूचा स्विकार करण्यास तयार नसतो. life after death

परंतु मित्रहो, मृत्यु म्हणजे सर्वस्वाचा शेवट नव्हे, तर ती एका नव्या जीवनाची सुरुवात आहे. ते केवळ ‘अस्वस्थांतर’ आहे नि म्हणूनच आचार्य रजनीश नेहमी आपल्या शिष्यांना सांगत की, ‘मी मेल्यावर दुःख करू नका व माझा ‘भूत कालवाचक’ उल्लेखही करू नका. उलट आनंद व्यक्त करा. कारण मी कधीच पूर्णपणे नष्ट होणार नाही हे लक्षात ठेवा. नि त्यानुसार त्यांच्या भक्तांनी त्यांच्या समाधीवर पुढील मार्मिक वाक्य कोरून ठेवले आहे . ‘हा कधीच जन्मला नव्हता, नि कधी मेलाही नाही. फक्त ११-१२- १९३१ ते १९-१-१९९० या काळात तो पृथ्वी नामक ग्रहाला भेट देऊन गेला..’ होय. भीती अज्ञानापोटी मृत्युबाबत मनुष्याला जी भीती वाटते त्याचे कारण त्याचे अज्ञानच मृत्यु म्हणजे आपल्या अस्तित्वाचा कायमचा अंत अशी जी मनुष्याची कल्पना झालेली असते तीच मनुष्याच्या मनात मृत्युविषयी उगाचच भीती निर्माण करीतअसते. वास्तविक मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा कायमचा अंत मुळीच नव्हे ! मृत्यूचे थोडक्यात वर्णन करायचे तर मृत्यू म्हणजे केवळ ‘अवस्थांतर‘ होय, असेच करावे लागेल ! ज्याप्रमाणे बाल्यावस्थेतून तारूण्यावस्थेत प्रवेश करणे हे अवस्थांतर आहे, तसेच तारूण्यातून वृद्धावस्थेत प्रवेश करणे हे अवस्थांतर आहे, अगदी त्याचप्रमाणे वृद्धावस्थेतून मृत्यूच्या जगात प्रवेश करणे हे देखील एक अवस्थांतरच आहे. याचे कारण देह गळून पडला तरी आत्मा अमर आहे. या जगात ज्याला ज्याला म्हणून आकार आहे त्या प्रत्येकाचा एक ना एक दिवस नाश हा ठरलेलाच आहे. देहाला आकार आहे, घराला आकार आहे, वृक्षाला आकार आहे, भांड्याला आकार आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत. परंतु आत्म्याला आकार नाही, परमेश्वर देखील निराकार आहे. त्यामुळे त्यांना नाश नाही.’

‘उपजे ते नासे’

ज्यांना आकार आहे त्यांचा दुसरा लक्षणीय गुण म्हणजे ‘सतत बदलत राहाणे!’ वेलीवरची कोवळी कळी कायम कळीच रहात नाही. तिचे लवकरच फूल बनते. जमिनीत पेरलेले इवलेसे बी सुद्धा कायम बी रहात नाही. त्यातून एक दिवस हळूच एक हसरा अंकुर बाहेर डोकावतो. तो अंकुर मग अंकुर राहात नाही, त्याची वाढ होत जाऊन त्याचा बनतो एक डेरेदार वृक्ष ! नदीतले झुळुझुळु वाहणारे पांढरेशुभ्र पाणी घ्या. नदी रोज वाहताना दिसली तरी तिच्यात रोज तेच पाणी नसते. पहिल्या पाण्याची वाफ होते, वाफेचे पुढे ढग बनतात. ते ढगदेखील लवकरच पावसाच्या रूपाने जमिनीवर कोसळतात ! अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. हे जगाचे रहाटगाडगे असे एकसारखे फिरते आहे. जग क्षणाक्षणाला बदलते

आहे. निर्माण झालेले नष्ट होते आहे आणि नष्ट झालेले पुन्हा निर्माण होते आहे. म्हणूनच श्री ज्ञानदेव म्हणतात

‘उपजे ते नाशे । नाशले पुनरपि दिसे । हे घटिका यंत्र तैसे । परिभ्रमे गा ॥ ज्ञा. २ / १५९

life after death
life after death

नाश नव्हे – ‘अवस्थांतर’

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट पूर्णपणे कधीही नष्ट होत नाही. ती नष्ट झाल्यासारखी दिसली तरी ती कोणत्या ना कोणत्या नव्या स्वरूपात शिल्लक असतेच ! तळ्यातले पाणी नाहीसे होऊन तळे कोरडे पडलेले दिसते. परंतु ते पाणी गेले कोठे ? ते कायमचे नाहीसे झाले काय ? एखादे घर जमीनदोस्त झाले. जेथे पूर्वी तीन मजली अलिशान वास्तू होती तेथे आता मोकळे मैदान आहे. या दोन उदाहरणात पाणी आणि घर डोळ्यांना दिसत नाही हे खरे. परंतु या दोन्ही गोष्टी पूर्णपणे नाहीशा झाल्या असे म्हणणे बरोबर होईल का ? पाणी हे आता ‘पाणी’ या स्वरूपात दिसत नाही हे खरे, परंतु वाफेच्या रूपात त्याचे अस्तित्व आहेच आहे ! तसेच घर हे कदाचित् ‘घर’ या स्वरूपात आता दिसत नसेल, त्याच्या भिंती दिसत नसतील, स्वयंपाकघर, दिवाणखाना, व्हरांडा हे सारे दिसत नसेल, परंतु एका वेगळ्या स्वरूपात ते घर अजूनही आहेच ! आता दगडीविटांच्या नि मातीच्या ढीगाच्या स्वरूपात त्या घराचे अस्तित्व शिल्लक आहे ! ती माती कालांतराने जमिनीशी एकरूप होईल आणि कदाचित् कुणी सांगावे, त्यातूनच कुणी नवीन विटा तयार करून एक नवी वास्तू उभी करील! तसेच वाफेच्या रूपात आकाशात गेलेले ते पाणी पुन्हा पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळेल आणि पाणी म्हणून वाहू लागेल!

अशा प्रकारे कोणतीही वस्तू कधीच पूर्णतः नष्ट होऊ शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. त्या वस्तूचे फक्त ‘अवस्थांतर’ होते. मनुष्य मृत्यू पावल्यानंतरही तो पूर्वीच्या स्थूल देहाने दिसत नसला तरी सूक्ष्म देहात त्याचे अस्तित्व शिल्लक असतेच असते ! मृत्यूनंतर जन्म आणि जन्मानंतर मृत्यू हे देखील अटळ असते ! जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडलेले काही उत्क्रांत जीव सोडले तर सर्वसामान्य जीवांना त्यांची विशिष्ट मर्यादे इतकी प्रगती होईपर्यंत जन्ममृत्यूच्या चक्रात हे फिरावेच लागते !

पूर्ण पुरूष बनणे हे ध्येय

जन्ममृत्यूचे हे रहाटगाडगे असे अव्याहत सुरू आहे. आणि हे रहाटगाडगे थांबवून मुक्तावस्था प्राप्त करून घेणे हाच मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे. मानवी जीवन हे जीवाच्या उत्क्रांतीमार्गावरील केवळ एक लहानसा टप्पा आहे. अनेक जन्मात वेगवेगळे अनुभव घेऊन जीवाला नव्या नव्या गोष्टींचे ज्ञान करून घ्यायचे आहे. नवे अनुभव प्राप्त करून घेऊन अधिक शहाणे बनावयाचे आहे. आणि एक दिवस भगवान् श्रीकृष्ण यांच्या प्रमाणेच प्रत्येकाला ‘पूर्ण पुरूष‘ व्हावयाचे आहे!

परंतु हे ध्येय एका जन्मात साध्य होईल असे नाही. त्यासाठी कदाचित् हजारो जन्मही घ्यावे लागतील ! प्रत्येक धर्मग्रंथात हे ध्येय साध्य करून घेण्याचे उपाय दिलेले असतात. आणि त्या मार्गानि प्रयत्नपूर्वक वाटचाल केली तर एक ना एक दिवस हे ध्येय दृष्टिपथात आल्याशिवाय राहात नाही. परंतु अडचण अशी आहे की या धर्मग्रंथांवर अलिकडील पिढी विश्वास ठेवायला तयार आहे कुठे ? त्यातील गोष्टी म्हणजे केवळ ‘भाकडकथा’ आहेत असे म्हणून तिकडे दुर्लक्ष करण्याचीच ‘फॅशन’ या नव्या पिढीत दुर्दैवाने निर्माण होत आहे !

‘आत्मा अमर आहे’ असे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितले असले तरी या जडवादी लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही. आणि त्यामुळेच चार्वाक तत्त्वज्ञानच योग्य वाटून ‘खा प्या मजा करा’ अशी वृत्ती दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. ‘मेल्यानंतर काय होते हे कुणी पाहिले आहे ? त्यापेक्षा जिवंत आहोत तेवढ्या काळातच मजा करून घ्या’ अशी विचारप्रणाली मूळ धरू लागली आहे आणि याच विशिष्ट टप्प्यावर परलोकविद्या संशोधनाची नितांत गरज निर्माण झाली आहे.

या परलोकविद्येचा विचार आपण पुढे करणारच आहोत. तत्पूर्वी मृत्यूमध्ये खरोखरच भिण्यासारखे काही आहे का ? मृत्यूच्या क्षणी नेमके काय घडते ? life after death

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *