राहू केतु दोष , कालसर्पयोग म्हणजे काय ? 

कालसर्पयोग म्हणजे काय ?
प्राचीन ग्रंथांमध्ये कालसर्पयोगाचा उल्लेख आढळत नाही. तथापि, काही ठिकाणी सर्पयोगाचा उल्लेख मात्र आलेला आहे. ह्या दोन्ही योगांमध्ये नावाखेरीज अन्य कोणतेही साम्य दिसून येत नाही. कालसर्पयोगाचा निर्देश नंतरच्या काळात जैन परंपरेतील ज्योतिषशास्त्राच्या आधारे झालेला आहे असे मानले जाते. त्यानुसार राहू व केतू ह्यांच्या दरम्यान एका बाजूस येणाऱ्या अन्य सात ग्रहांच्या परिस्थितीस ‘कालसर्पयोग’ म्हणतात. ह्या दुर्लक्षित योगाची परिणामकारकता सर्पयोगाहून अधिक असते हे दर्शवण्यासाठी ह्या योगाचे नामकरण कालसर्पयोग असे झालेले असावे.

अर्थात, येथे ‘काल’ ह्या पदाचा अर्थ ‘मृत्यू’ असा न होता हानी किंवा नुकसान असा अभिप्रेत आहे. काही ठिकाणी ह्या योगाच्या दुष्परिणामांचे भडक व अतिशयोक्तिपूर्ण वर्णन करण्यात आल्यामुळे कालसर्पयोग थोडाफार वादाचाच विषय ठरतो. कुंडलीत कालसर्पयोग कसा असतो ? – ह्या प्रश्नाची चर्चा करण्यापूर्वी जन्मकुंडली म्हणजे काय हे थोडक्यात माहीत करून घेऊ. जन्म होताना आकाशातील ग्रहस्थिती ही जन्मकुंडलीच्या रूपाने मांडली जाते. त्यानुसार लग्नस्थानी पूर्वक्षितिज असते. प्रदक्षिणाक्रमाने येणारे (१२, ११, ७) सप्तमस्थान हे पश्चिम क्षितिज असते. संपूर्ण आकाशाची विभागणी बारा भागामध्ये केल्यास १, १२, ११, १०, ९, ८ ही स्थाने दिनस्थिती दर्शवतात तर उर्वरित स्थाने रात्रीची स्थिती दर्शवतात. थोडक्यात साधारणपणे सकाळी सूर्य उगवताना ज्याचा जन्म झाला त्याच्या कुंडलीत प्रथम स्थानात रवी असतो नंतर सुमारे दोन तासांनी तो बाराव्या स्थानात येतो. सूर्याप्रमाणेच इतर ग्रहांची त्या-त्या वेळची स्थिती कुंडलीत असते. कुंडलीतील ह्या बारा स्थानांची नावे व त्या-त्या स्थानाचे फलित पुढीलप्रमाणे आहे.कालसर्पयोगासाठी राहू व केतू ह्यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहांची स्थिती विचारात घेतली जाते. जर सर्व ग्रह राहू व केतू ह्यांच्या दरम्यान एकाच बाजूला असतील तर त्या कुंडलीमध्ये सकृद्दर्शनी कालसर्पयोग असतो. हर्षल, नेपच्यून, प्लूटो हे ग्रह कालसर्प योगासाठी विचारात घेतले जात नाहीत. वास्तविक, राहू व केतू हे ग्रह नसून ह्यांच्या भ्रमणकक्षांचे छेदनबिंदू आहेत. तरीही फलज्योतिषशास्त्रदृष्ट्या त्यांना ग्रहाइतकेच महत्त्व दिलेले आहे.

 चंद्र-सूर्य कालसर्पयोगाचा परिणाम – कालसर्पाच्या योगाचा परिणाम भयंकर असतो अशी । काहीतरी समजूत समाजामध्ये प्रचलित आहे. परंतु वास्तवात राहू व केतू ह्यांच्या दरम्यान एका बाजूची जी स्थाने असतात ती स्थाने केवळ निर्बली असू शकतात. म्हणजेच त्या • स्थानांवर गोचरीच्या चांगल्या ग्रहांचेही सुपरिणाम होत नाहीत. पण त्याच वेळी राहुकेतूंच्या दुसऱ्या बाजूची स्थाने शुद्ध राहतात व त्यांचे लाभ जातकास मिळतात. निसर्गाने एखाद्यास जन्मतःच नेत्रहीन ठेवले असेल तर त्याची इतर इंद्रिये जादा कार्यक्षम बनतात व त्या आधारे तो समाजातील व्यवहार उत्तम रितीने पार पाडत असतो. नेमकी तशीच परिस्थिती कालसर्पयोग असणाऱ्या कुंडलीमध्ये असते. जी स्थाने दूषित झालेली असतात त्याच्या विरुद्ध बाजूच्या स्थानातील फलनिर्देशानुसार जातकाची अनन्यसाधारण प्रगती होत असते. इतिहासामध्ये थोडे डोकावले असता असे दिसून येते की, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, मुसोलिनी, हिटलर अशा ख्यातनाम व्यक्ती कालसर्पयोग असलेल्या होत्या. त्याप्रमाणेच साहित्य, संगीत, शिल्पकला, स्थापत्यशास्त्र, विज्ञान इत्यादी विविध क्षेत्रांतदेखील अत्युच्च शिखरावर पोचलेल्या काही व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग दिसून येतो. दत्ताचा महावतार गणलेल्या श्रीस्वामिसमर्थ (अक्कलकोट) ह्यांच्या कुंडलीतही हा योग आहे. कालसर्पयोग असणाऱ्या व्यक्ती नेहमीचे चाकोरीबद्ध सामान्य जीवन न जगता आव्हानात्मक जीवन जगत असतात. त्यांना सुखदुःख, मानापमान, उन्नती-अवनती इत्यादींच्या बाबतीत परस्परविरोधी अवस्थांतून जावे लागते. जेथे कीर्ती, यश, ऐश्वर्य, साक्षात्कार, उच्च कोटीची ज्ञानसाधना ह्या प्रांतांत परमोच्च स्थिती प्राप्त होण्याचे योग असतात तेथेच समाजाकडून निर्भर्त्सना, अपयश, हलाखी इत्यादी अनिष्ट खडतर योगही असतात. पण कालसर्पयोगाचे योग्य मार्गाने उन्नयन झाले तर त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत उच्चकोटी प्राप्त होऊ शकते. जातकाच्या अंगी दुर्दम्य इच्छाशक्ती व जिद्द असेल तर कुंडलीत कालसर्पयोग असतानादेखील ते यशाचे उत्तुंग शिखर पार करतात आणि तेव्हादेखील ते स्थितप्रज्ञच राहतात.

विवाहाच्या कुंडल्या जमवताना मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत कालसर्पयोग असेल तर ती कुंडली त्याज्य न ठरविता स्वागतार्हच ठरवणे इष्ट असते. कारण असे जातक खऱ्याखुऱ्या अर्थाने आव्हानात्मक मानवी जीवन जगून स्वतःचे सार्थक करणारे ठरतात.

कालसर्पयोगाच्या दुष्परिणामांचे भडक व अतिशयोक्त वर्णन सोडल्यास एक गोष्ट

निर्विवादपणे मान्य करावी लागते की ह्या योगामध्ये निश्चितपणे काहीतरी तथ्यांश आहे.

कारण कालसर्पयोगावर जन्मलेल्या व्यक्ती कोणत्यातरी एका बाजूने लंगड्या असतात.

विशेषतः अविरत कष्ट करूनही हवी तशी यशःप्राप्ती न होणे व स्थैर्य न लाभणे कालसर्पयोगाचे प्रमुख लक्षण मानावे लागेल. कालसर्पयोगाचे विविध ग्रहयोग सांगितले जातात. शिवाय नक्षत्र, ग्रहस्थाने, राहू-केतूंची उलटी भ्रमणे इत्यादी अनेक ठोकताळ्यातून ग्रहांच्या जातीनुसार व स्थानांच्या क्रमांकानुसार अनंत, कुलिक, वासुकी इत्यादी विविध कालसर्पयोग सांगितले जातात. कालसर्पाच्या दुष्परिणामाबद्दल फारशी मतभिन्नता नसली तरी कालसर्पनिवारक उपायांबद्दल मतभिन्नता आढळते. काही प्रांतांत कालसर्पयोगाची शांती केली जाते. अर्थात, इतर विधीप्रमाणे हाही विधी मनःपूर्वकपणे श्रद्धेने केल्यास त्या-त्या देवता अतिवाहिक स्वरूपात तेथे उपस्थित राहून किंवा जातकाच्या मनावर शांतिकर्माचा अनामिक परिणाम होऊन त्याचे मनोबल वाढते व त्याच्या बाबतीतील दुष्परिणाम दूर होतात असे प्रयोगांती अनुमान काढण्याइतपत अनुभव येतात. फक्त उपायांची निर्दोषता व जातकाची अतूट श्रद्धा ह्या गोष्टी येथे आवश्यक ठरतात.

कालसर्पयोगास परिहार – देवांचा अधिपती शंकर हा ‘महाकाल’ असल्यामुळे त्याचे कालावर नियंत्रण असते. त्यामुळे कुंडलीत कालसर्पयोग असलेल्या जातकाने आपल्या कुलदेवतेची व शंकराची यथाविधि पण मनःपूर्वक आराधना करावी. इच्छा व सवड असेल तर उपोषणपूर्वक नवनागांची पूजा करून पंचमीचे व्रत करावे. तथापि, भयंकर मनस्ताप, सतत आजारपण, आवक असूनही सदैव आर्थिक ओढाताण इत्यादी अनाकलनीय गोष्टी घडत जाऊन त्याचा मनस्ताप सहनशक्तीपलीकडे होत असेल तर मात्र कालसर्पयोगाची शांती अवश्य करावी.
वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन नांदेड…
लिखित:—वैभव गुरू डंख नांदेड
9960223870
पत्ता लेबर कॉलनी हनुमान मंदीर नांदेड…

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *