अध्याय २७ – काय करावे, काय करू नये!
भगवान वैकुंठविहारी लक्ष्मीला म्हणाले, “रमा, प्रिये, अधिकमासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादि पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते.
ज्या घरी हे अधिकमास व्रत निष्ठापूर्वक विधीयुक्त होते त्या घरी उत्साहाचे पवित्र वातावरण राहाते. त्या घरी देवतांचा निवास होतो. त्यामुळे त्या घरातील दुःख व संकटे दूर पळतात. सर्व बाधा नाहीशा होतात. ते घर संतती व संपत्तीने भरून जाते.
अधिकमासात सांगितलेली अनेक व्रते, दाने, पुण्यकर्मे ज्या
कोणाला करणे शक्य नसेल त्याने आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती एखादा तरी नियम पाळावा. नित्यनेमाने स्नान, देवदर्शन, एकमुक्त भोजन, भूमिशयन, पोथीवाचन, श्रवण, शक्य ते दान, उपोषण, तुलसीपूजा याप्रमाणे नियम पाळावे.”
या नियमातील कोणतेही एक व्रत पाळल्यावर त्याचे उद्यापन शेवटी करावे. नक्तभोजन, मौनभोजन अशा व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटी ब्राह्मणाला भोजन किंवा शिधा देऊन करावे. देवळात एखादी घंटा बांधूनही मौनभोजनाचे उद्यापन होते. दीपदान आणि तेहतीस अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे वस्तू यथाशक्ती दान दिल्यानेही उद्यापन साधते. याप्रमाणे शक्य ते एखादे तरी पुण्यकर्म करावे.
या महिन्यात कांदा, लसूण, मसूर डाळ, शिळे अन्न वगैरे उत्तेजक, मांसल, मादक वस्तू खाऊ नयेत. अपेय पिऊ नये. परद्रोह, परनिंदा करु नये. रागाने बोलू नये. नको तेथे बसू नये. अशा प्रकारे आपले आरोग्य बिघडेल. मन अस्वस्थ होईल-अशा गोष्टी करू नयेत. कारण या तेराव्या महिन्यात एकही सूर्यसंक्रात नसल्याने वातावरण मलीन बनलेले असते. अशावेळी निर्मळ राहून आपले आपण पवित्र बनले पाहिजे!
याप्रमाणे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये ते सांगितल्यावर पुढे अठ्ठाविसाव्या अध्यायात आणखी एक कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली ती ऐकावी.