अध्याय १९ – द्वादशीचे महत्त्व
“अती महान द्वादशी तिथी। बारा वाटा विघ्ने पळती।” अधिकमासातील पंचपर्वांमध्ये द्वादशी पर्वाचे महत्त्व फारच मोठे आहे. भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, या पर्वातील थोडे जरी नियम पाळले तरी मनुष्याला मोक्ष पद मिळते. द्वादशी तिथी ही श्रीहरीची सर्वात जास्त प्रिय तिथी आहे. एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला पारणे करावे.
द्वादशीला एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे. पितरांना तर्पण करावे. ब्राह्मणांना जलदान, अन्नदान द्यावे. धान्यदान, वस्त्रदान, पात्रदान, भूदान, सुवर्णदान, गोदान अशा अनेक दानांपैकी यथाशक्ती दान निष्ठापूर्वक करावे. विद्यादानाचे महत्त्व या तिथीला विशेष आहे. प्रत्येकाने अधिकमासातील द्वादशीला ‘अधिकमास माहात्म्य’ ही पोथी, पुस्तके, ग्रंथ शक्य तितक्या जास्त प्रती निदान पाच, सात किंवा बारा प्रती दान कराव्यात. – अधिकमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील द्वादशींना तूपदान, दीपदान दिल्याने लाभते. फार पुण्य लाभते. द्रव्य दान केल्याने मनोकामना पूर्ण होतात. प्रेम वाढते. सर्व पापे नाहीशी होतात. आरोग्य प्राप्त होते. समाधान, सुख मिळते. कामधंद्यात प्रगती होते.
द्वादशीला अन्नदान करणे हा एक मोठाच फायदा आहे. अन्नदान हे सर्व दानात श्रेष्ठ असे दान आहे. अन्नदात्याला प्राणदाता’ असे म्हणतात. तो देवरूप असतो. चैत्र वैशाखात जलदान, पौष माघात तीळगूळ दान अशा दानापेक्षाही अन्नदान आणि तेही अधिकमासातील
द्वादशीपर्वात जर केले तर साक्षात पुरुषोत्तम प्रसन्न होतात. या पर्वात अन्नावर, धान्यावर तुळशीपत्र ठेवून ते सत्पात्री दान करावे. गाईला अन्न चारावे आणि भुकेलेल्या इसमास अन्नदानाने संतुष्ट करावे.
या द्वादशी पर्वाच्या पुण्याईमुळे प्रत्यक्ष कुबेराला देवांच्या खजिन्याचे भांडार प्राप्त झाले. इंद्राला इंद्रपद मिळाले. यमाला प्रजासंयमाचे बळ मिळाले. दुर्वास मुनींच्या रागापासून अंबरीष राजाचे संरक्षण झाले.
अंबरीष राजाने एकादशी व्रत नियमाने केले होते. त्याच्या पारण्यास | दुर्वास मुनींना त्याने भोजनास निमंत्रण दिले होते; पण द्वादशीच्या दिवशी पारणे भोजनास येण्यासाठी दुर्वास मुनींना उशीर झाला. तोपर्यंत अंबरीष राजाने श्रीहरीचे तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वास मुनींना त्यामुळे खूप | | राग आला. अंबरीष राजाला दुर्वास मुनी शापून भस्म करणार होते. तेवढ्यात श्रीहरीने आपले सुदर्शन चक्र दुर्वास मुनींवर सोडले.
त्या चक्राच्या भीतीने दुर्वास मुनी पळून गेले. त्यांच्या मागे ते सुदर्शन चक्रही फिरतच होते. त्यामुळे दुर्वासाला पळता भुई थोडी झाली. श्रीहरीने आपला भक्त राजा अंबरीष याचे रक्षण केले आणि कोपिष्ट दुर्वासाला पिटाळून लावले. ही कथा पुराणात प्रसिद्ध आहे.
पंचपर्वातील अधिकमास द्वादशीच्या दिवशी तुपात तळलेले तेहतीस अनारसे पात्रात ठेवून त्यावर वस्त्र झाकून ते जावयास किंवा ब्राह्मणास दान द्यावेत. या अशा दानामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन कल्याण करतो. – अनारशाऐवजी तेहतीस बत्तासे, खारका किंवा सुपाऱ्या किंवा फळेही दान दिल्यास तितकेच पुण्य मिळते. द्वादशीला आप्तेष्ट मित्रांना, ब्राह्मण सुवासिनींना पक्वान्न-पुरणाचे धोंडे करून भोजन द्यावे आणि कर्पूर (कापूर) विड्याचे तांबूल द्यावे. तुळशीची पूजा आणि गोग्रास करून नंतर आपण भोजन करावे.
भगवान विष्णूंनी लक्ष्मीला अधिकमासातील पंचपर्वांची माहिती सांगितल्यावर त्या व्रतदानाच्या पुण्याईने कोणाकोणाचा कसा उद्धार
झाला, त्या कथा सांगितल्या. पुढे २० व्या अध्यायात ‘स्मितविलासिनी’ या अप्सरेची कथा आहे ती ऐका!