अध्याय २८ – सुमती राजाची आत्मकथा
पूर्वी कृतयुगात सुमती नावाचा एक सोमवंशी राजा होता. त्याची राणी सुष्टमती महाभाग्यवती व पतिव्रता स्त्री होती. राजा आणि राणी
दोघेही अतिशय शीलवान, धर्मपरायण आणि प्रजापालनात तत्पर होती. त्यांचे राज्य वैभवसंपन्न, सुखी आणि समाधानी होते. राजाने प्रजेकरिता अन्नछत्रे, विहिरी, तलाव वगैरे अनेक सुखसोयी केल्या होत्या. स्वतः राजा-राणी सतत अन्नदान आणि अधिकमासातील अनेक व्रते, नियम करीत असत.
एकदा अधिकमासात सुमती राजाकडे अंगिरस नावाचे ऋषी आले. राजाने त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. राजा म्हणाला, “मुनिवर्य, आपल्या दर्शनाने या अधिकमास पुण्यकाळात आम्ही कृतकृत्य झालो. खूप आनंद झाला.”
अंगिरस ऋषी म्हणाले, “राजा तू धन्य आहेस. तुझ्या या राजवैभवाला तसेच, विद्वत्तेला विनयामुळे शोभा आहे. विनम्रतेमुळे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधता येतात. तुझे आणि राणीचे कल्याण असो.”
मग बोलता बोलता सहजच अधिकमासातील व्रत दानाच्या आणि श्रीपुरुषोत्तमाप्रीत्यर्थ केलेल्या सर्व पुण्यकर्मांच्या गोष्टींची चर्चा त्या उभयतात झाली.
अंगिरस ऋषी म्हणाले, “राजा, तुलाया जन्मी हे जे अपार राजवैभव आणि सुखसमाधान प्राप्त झाले ते तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ आहे.”
“होय मुनिवर्य! या जन्मात अशा संपन्नतेत, राजवैभवात आणि सुखसमाधानात असूनही आम्ही उभयतांनी कधी गर्व केला नाही. चैनविलास भोगला नाही. सतत भगवान श्रीपुरुषोत्तमाच्या आराधनेत मग्न राहून योग्य तो दानधर्म करीत आहोत. ही सर्व त्याचीच कृपा आहे ! त्याच्या कृपेनेच मला माझ्या पूर्वजन्माच्या हकीगतीचेही स्मरण आहे. ती माझी आत्मकथाच मी तुम्हाला सांगतो.” एवढे बोलून सुमती राजा अंगिरस मुनींना त्याची आत्मकथा सांगू लागला.
सुमती राजा म्हणाला, “मुनिवर्य, मी माझ्या पूर्वजन्मात वीरनामा
नावाचा एक श्रीमंत मनुष्य होतो. गर्विष्ठ होतो. सतत चैनीत, विलासात राहात होतो. त्या काळात मी अनेक पापकर्मे केली. दुसऱ्यांचे खूप धन लुबाडले. अनेक साधुसज्जनांची निंदा केली. द्वेष केला. गोब्राह्मणांचा व स्त्रियांचा अनन्वित छळही केला.”
“माझ्या त्या दुष्ट वर्तनाचा लोकांना कंटाळा आला. पुढे मला समाजात कोणीच मान देईना. सारे लोक मला दूर ठेवू लागले. चैनीत व विलासात माझे सारे धनही संपले. मला हळूहळू हीन दीन दशा प्राप्त झाली.
“मग मी वैतागून माझे घरदार आणि गाव सोडून दूर अरण्यात राहू लागलो. तेथे वनवासी दुःखी जीवन कंठीत असतानाच मी क्रूरकर्मेही करु लागलो. त्या जंगलात येणाऱ्या स्त्रियांना मी त्रास देऊ लागलो. वाटमारी करुन लोकांना छळू लागलो. शिकार करून पोट भरू लागलो. पशुपक्ष्यांना सुद्धा मी नकोसा झालो.”
“मग तेही जंगल सोडून मी दूर दूर निर्जन वनात निवास करु लागलो. त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी श्रीविष्णूचे एक पडके देऊळ होते. जवळच एक सरोवर होते. एकदा मी त्या सरोवरातील पाणी पिऊन देवळाच्या लहानशा ओट्यावर बसलो होतो तोच काय नवल!
माझी बायको कुलीना त्याठिकाणी अचानक आली. मला आश्चर्य वाटले. आनंदही झाला. मी तिला विचारले, “तू इथे कशी?” ती म्हणाली, “काय करणार ! तुम्ही घरातून निघून गेल्यावर मी त्या घरात राहू कशी? मग मी तुम्हांला शोधीत धुंडीत अखेर येथे आले. भेट झाली. आनंद वाटला. जेथे पती तेथे सती हे माझ्या जीवाचे सार्थक!”
नंतर मला धीर देऊन समजूत घालून ती म्हणाली, “प्राणनाथ, झाले गेले ते सोडून द्यावे आणि आता तरी पुढे या निर्जन वनात आपण विष्णूची सेवा या मंदिरात करू ! या सेवेने आपला उद्धार होईल. आपले कल्याणच होईल!”
“तिच्या त्या नम्रपणाच्या व धीराच्या उपदेशामुळे मला भडभडून
आले. कृतकर्माचा खूप पश्चात्ताप झाला. त्या तिच्या माझ्यावरील प्रेमाचा, मायेचा, आदराचा माझ्यावर चांगलाच परिणाम झाला. माझी मलाच खूप लाज वाटली. ही बायको नसून देवताच आहे असे वाटले. माझ्यासाठी तिने केवढ्या हाल अपेष्टा, अपमान सोसले आणि मी-? छे छे ! बस आता तरी पुढे…”
“मग आम्ही उभयतांनी त्या पडक्या हरिमंदिराच्या भोवतालची जागा साफ केली. देवळाची डागडुजी केली. पुढे अधिकमास आला. त्या पवित्र महिन्यात तिच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्या मंदिराभोवती रोज सडा सारवण करायचो. तलावात नित्यनेमाने पहाटेच स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. उपवास, मौन, शुद्धाचरण वगैरे पुण्यकर्मे करावी. असे शक्य ते सर्व व्रत, नियम अधिकमासात निष्ठापूर्वक करून भगवान विष्णूची कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली. थाटाने | अधिकमास व्रत उद्यापनही केले.”
“पुढे मरेपर्यंत आम्ही दोघेही त्याच मंदिराजवळ राहून समाधानाने जीवन कंठले आणि मग तो जन्म सोडला. त्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळेच आम्हांला आता या जन्मी हे राजवैभव आणि सुखसमाधान लाभले आहे!”
सुमती राजाची ती आत्मकथा ऐकून अंगिरस ऋषींना आनंद वाटला. राजाचा निरोप घेऊन मग ते आपल्या आश्रमात परत गेले.
भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी, असा आहे हा अधिकमास व्रत | पुण्याईचा महिमा.” __रमाविष्णू संवादाच्या या सर्व कथा वाल्मिकी मुनींनी दृढधन्वा राजाला सांगितल्या. आणि त्यांनी दृढधन्वा राजाला तसेच, गुणसुंदरी राणीला कल्याणाचे आशीर्वाद देऊन शरयू तीरावरील आश्रमाकडे ते निघून गेले.
नारदाला नारायण म्हणाले, “आता पुढे दोन तीन अध्यायात तुला आधिकमासाच्या आणखी कथा सांगतो त्या ऐकाव्या आणि लोकांना सांगाव्या!”
सुमती राजाची आत्मकथा