येथे श्रीसूक्ता च्या फलश्रुति बद्दल विवेचन आहे ते शांतपणे तन्मयताने वाचा. लक्ष्मी म्हणजे काय कळेल:-


वाचनात आलेलं छानसं, मार्मिक आणि बुद्धीला चालना देणारे असे महालक्ष्मी निमित्ताने काही तरी..
👇👇👇👇👇
आम्हाला वेद शिकवले नाही, आम्हाला उपनिषदे शिकवले नाहीत म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात?म्हणून आज जे ७००० वर्षांपूर्वी सांगितलं ते आज मितीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्री सुक्ता मधून पाहू.ज्यांना यातून आपल्या संस्कृतीचा बोध घ्यायचा ते घेतील आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमान सुद्धा बाळगतील.


श्री सूक्तामधील फलश्रुती मधील दहाव्या श्लोकात


ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् असं म्हंटलेलं आहे. म्हणजे काय तर महालक्ष्म्यै च विद्महे म्हणजे आम्ही महालक्ष्मी ला जाणतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर हे कशासाठी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो, सन्मार्गावर चालण्याची बुध्दी देवो आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्रीसुक्त हा आधार आहे. आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर सत राव्या श्लोकात म्हणजेच फल श्रुतीच्या पहिल्याश्लोकात तन्मे भजसिं पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्‌॥ म्हणजेच तिला भजल्यानंतर,तिची पूजा केल्यावर, अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे तर येन म्हणजे यामुळे सौख्य, सुख मिळालं पाहिजे कोणाला तर अहम् म्हणजे मला. त्यामुळे जे जे सुख देणारं आहे ते सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे आणि तो पुरेसा वाव श्रीसुक्ताने आपल्याला दिलेला आहे.आपण धन म्हणजे पैसा समजतो परंतु श्रीसूक्ताच्या २१ व्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे की धन कशाला म्हणायचं तर धनमाग्नि धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसु धन मिंद्रो बृहस्पतिर्वरुणां धनमस्तु मे॥
अग्नी,वायू ,सूर्य,वरुण म्हणजे जे काही पंचमहाभूत आहेत ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे ते सर्व धन आहे, थोडक्यात काय तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि हे पर्यावरणप्रेम आपल्या पूर्वजांनी ७००० वर्षांपूर्वी आपल्या ला सांगून ठेवलं आहे.पण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याची इच्छा पण आपल्याला झाली नाही.हे झालं समाजाबद्दल, देशाबद्दल किंवा विश्वाबद्दल. परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुध्दा श्रीसुक्तात अतिशय छान सांगितलेलं आहे..पुत्र पौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथम्‌। व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं तर पुत्र, म्हणजे मुलं (यात मुलं मुली दोन्हीही आलेत) पौत्र म्हणजे नातवंडं,जे असले की कुटुंबव्यवस्था निर्माण होते,आपु लकी असते,एकमेकांना आधार असतो.धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागते.त्याचप्रमाणे हत्ती,अश्व,रथ,गाय यांना म्हणजे जंगलीप्राणी आणि पाळीवप्राणी त्याचसोबत रथ म्हणजे दळण वळणाचे साधन हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हंटले आहे.दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे
यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरूषानहम् ।। गायी,अश्व त्यांच्या जोडीला सेवक,आप्त स्वकीय, नोकर-चाकर यांना सुद्धा धन म्हंटले आहे आणि तेच पुन्हा १५व्या श्लोकात सांगितलेलं…
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् म्हणजे त्यालासुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल.आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना


श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॥
काय पाहिजे आम्हाला? तर या इहलोकामधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतावान इंद्रिय हवेत, निरामय आयुष्य हवं ते सुद्धा धन आहे. त्यामुळे केवळ पैसा मिळविणे हे साध्य नाही तर सुख मिळविणे हे साध्य आहे म्हणून मिळवलेला पैसा, संपत्ती, वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी, वापरण्यासाठी शत संवत्सर निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे. एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे जो आपल्याला श्रीसुक्तमध्ये दिलेला आहे.पैसा हा वस्तुनिष्ठ आहे.पैसा हा साधन आहे.परंतु सुखशांती हे व्यक्तिनिष्ठ आहे. ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे. त्याची आम्ही प्रार्थना श्री सुक्तातून करतो. यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी वाटत असलं तरी हे ऋग्वेदातील सुक्त आहे जे स्फुरलेलं आहे रचलेलं नाही. त्यामुळे जे स्फुरते ते अनुभूतीमधून असते..ठरवून लिहिलेलं नाही. त्यामुळे पैसा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही पण त्यासोबत आपला मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्याची आवश्यकता आहे.असा संबंध जोडला तर आपल्याला तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो. न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः


लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नित जळून जाणार नाही, मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही ज्याला अशुभमती म्हणजे अशुभबुद्धी होणार नाही असा जो तो लक्ष्मी असल्याचा निदर्शक आहे. म्हणून पूर्वीच्याकाळी हे पाठ करून घेत त्याचा अर्थ समजावून सांगत, आज आम्ही पाठांतर तर दूरच, अर्थ कुठून समजावून घेणार?
श्रीसुक्तमध्ये अजून एक छान शब्द आहे अलक्ष्मी म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी, परंतु अलक्ष्मी नको. या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठीबहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख श्रीसुक्तमध्ये आहे.आठ व्या श्लोकात म्हटलं आहे की,
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
क्षुत म्हणजे भूक, पिपसा म्हणजे तहान यांच्यामुळे मलिन झालेली आहे अशी याचा भावार्थ हा की वखवख, हाव, अतृप्ती,लालसा,खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्छा निर्माण व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं.६ व्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे की,
मया अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः
म्हणजे माया, मोह, अज्ञान,भुल हे बाह्य दारिद्र्य आहे. तसेच इंद्रियांची अक्षमता हे सुध्दा बाह्य दारिद्र्य आहे. त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे. लक्ष्मी अजून कशी आहे याचं सुरेखवर्णन यात केलेलं आहे चन्द्रां प्रभासां यशसा केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणूननाही, तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रा सारखा शीतल असावा, त्याची प्रभा आपोआप प्रसरणार आहेच त्याला दाखवायची गरज नसावी, आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो. दहा बोटात दहा अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते.. म्हणजे आलेला पैसा, संपत्ती ही आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही याची शाश्वती नाही. किंवा ती अशामार्गाने आली की दाखविण्यासाठी हा डोलारा.


तृप्तां तर्पयन्तीम् ।
म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयो गात येईल.अजून पुढे सांगितलं आहे की लक्ष्मी कशी हवी तर
गन्धद्वारां दुराधर्षां,नित्यपुष्टां करीषिणीम्।
दुराधर्षां,म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. नित्यपुष्टाम म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी, पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी.
आर्द्रां पुष्करिणीं यष्टिं
म्हणजे जिच्या मनात प्रेमाचा ओलावा जिव्हाळा आहे अशी लक्ष्मी हवी.पैसा आला त्यानंतर जर का वर सांगितल्या प्रमाणे जो कोणी असेल तो खरा लक्ष्मीवान आणि हे जर नसेल तर केवळ पैसेवाला..अजून छान शब्द आलाआहे लक्ष्मीमनपगामिनीम्।
म्हणजे गैरमार्गाने जाणारी किंवा अपमार्गाने जाणारी नको. म्हणजे कोणत्या व्यसनात, वाममार्गात, वाईट गोष्टीसाठी,जुगार खेळण्यात, विकृत उपभोगासठी तिचा उपयोग न व्हावा.
ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्
ज्वलन्तीं म्हणजे तेजःपुंज,लक्ष्मीवान जसा तेजःपुंज असतो तशी,पुष्कळवेळा पैसा असूनही तेज नसते, देव जुष्टाम हे विशेषण आहे म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे,त्याच बरोबर कायम कृतज्ञभाव असला पाहिजे.पण मग ही लक्ष्मी कशी असावी तर
अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनाद प्रमोदिनीम्।
जिच्या पुढे घोडे आहेत,जी रथात बसून येते जी येण्याचा संकेत हत्तीच्या चित्कार द्वारा कळतो. अशी वाजतगाजत, म्हणजे राजरोसपणे आलेली हवी. टेबलाखालून आलेली, किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको.
हे सर्व ७००० वर्षांपूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं.
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌॥
म्हणजे लक्ष्मी आम च्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सुबुद्धी दे.
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌॥🙏🏻

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *