भगवान नारायण नारद मुनींना म्हणाले, “नारदा, यमराजाने कदर्याला चित्रगुप्ताच्या सल्ल्याने लोभी आणि कंजुषपणाचे फळ म्हणून राक्षस योनीत फिरण्याची घोर शिक्षा दिली. आणि त्यानंतर बागेत फळे चोरुन खाल्ली व मित्राचा विश्वासघात केला म्हणून वानर योनीत | राहन रानावनात भटकत राहण्याची शिक्षा दिली.
यमदूतांनी त्या कदर्याला राक्षस योनीपेक्षाही नीच अशा प्रेत योनीत ढकलून दिले. तो कदर्य आता नर किंवा राक्षस न राहता भूत-पिशाच्च बनला आणि अत्यंत घोर अशा अरण्यात हा हा करीत फिरु लागला.
त्या पिशाच्चाला आपल्या केलेल्या पापांचे, अत्यंत लोभीपणाचे, पूर्वजन्मीच्या कंजुषपणाचे आता वारंवार स्मरण होई आणि मग तो रडत ओरडत आणि रखडत त्या निर्जन वनात भटकत राही.
अशा प्रकारे त्या पिशाच्च योनीतील सर्व दुःखे भोगून तो कदर्य | ठरल्या वेळी वानर योनीत गेला. त्या वानर योनीत मात्र त्याची खूप मजा झाली.
कलंजर नावाच्या पर्वतावर जांभळीच्या झाडांचे दाट वन होते. तसेच, एका तलावाच्या काठावर काही देवतांची सुंदर व टुमदार मंदिरे होती. अतिशय रम्य असा तो परिसर होता. त्या परिसरात पूर्वजन्मीच्या त्या नरकदर्य, पिशाच्च वानराने आश्रय घेतला. त्या परिसरात स्वत: देवेंद्राने मृगतीर्थ नावाचे एक मोठे सरोवर तयार
केले होते. अनेक देवदेवता त्या सुंदर सरोवरावर मृगाचे -हरिणाचेरुप घेऊन तेथील ते अमृतमय पाणी पिण्यास येत असत आणि स्नानही करीत असत. म्हणून तेथील एका कुंडाला मृगतीर्थ हे नाव पडले होते. त्या मृगतीर्थाच्या जवळच तो कदर्य वानर राहू लागला. त्याची तेथे खूप मजाच झाली.
नारदाने विचारले, “नारायणा, त्या कदर्याला ती मृगतीर्थाजवळ अत्यंत रमणीय आणि देवादिकांनी पवित्र केलेली अशी जागा वस्तीसाठी कशी मिळाली? कारण तो कदर्य अतिशय लोभी, पापी, विश्वासघातकी राक्षस नीचाला ती एवढी पावनभूमी राहण्यास कशी मिळाली? वास्तविक ती पुण्यभूमी…”
नारायण हसून म्हणाले, “नारदा, तेच तर सत्य आहे. तो कदर्य एवढा पापी पिशाच्च होता तरी त्याला वानर जन्मात मृगतीर्थाच्या सुंदर परिसरात जागा मिळाली याचे कारण मी तुला सांगतो ते ऐक!”
“चित्रकुंडल नावाचा एक वाणी अणि त्याची पत्नी तारका ही दोघे अधिकमासातील व्रते, नियम, दानधर्म अतिशय निष्ठेने करीत असत. उद्यापनाच्या दिवशी पूर्वजन्मीचा हा चित्रशर्मा-कदर्य त्या वाण्याच्या घरी दान मागण्यास गेला होता.”
“कदर्याने तो पुरुषोत्तम प्रभूचा थाटाचा समारंभ पाहिला. पूजा विधी पाहिला. त्या वाण्याने त्यावेळी खूप दानधर्म केला. कदर्याला यथाशक्ती खूप दान-दक्षिणा दिली; पण हा धनलोभी कंजुष कदर्य आणखी द्रव्य त्याला मागत होता.”
“भगवान पुरुषोत्तमाची आणि त्या वाणी दांपत्याची कदर्याने त्यावेळी अफाट स्तुती केली आणि अधिकाधिक द्रव्य दान मागू लागला. त्याने खूप गयावया केली. रडला सुद्धा! मग त्या वाण्याने या कदर्याला आणखी द्रव्य दान दिले.”
“अशा प्रकारे द्रव्य याचनेच्या निमित्ताने का होईना या कदर्याला अधिकमासात भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन, पूजा, नामस्मरण असे पुण्य
सहजच प्राप्त झाले. म्हणून पुढे या वानरयोनीत त्याला मृगतीर्थाच्या | पावन जागी राहण्याचे भाग्य मिळाले. अधिकमासाचे माहात्म्यच असे | आहे, की त्यात नकळत जरी थोडेसे पुण्य घडले तर…”
नारद पुन: म्हणाला, “नारायणा, ते ठीकच झाले म्हणा- त्या | धनलोभी व कंजुष कदर्याला अधिकमासात नकळत जे पुण्य घडले
त्यामुळे पुढे वानरयोनीत त्याला मृगतीर्थासारख्या पुण्यभूमीत राहण्यास | जागा मिळाली; पण त्या पापी वानरामुळे त्या सरोवराचे पाणी आटले
असते. तेथील झाडांची फळे गळून पडली असती, त्या पाप्याच्या | रहिवासामळे…”
“नाही नाही नारदा, तसे काहीच झाले नाही! कारण पूर्वजन्मीचा तो कंजुष कदर्य जरी पापी होता तरी आता तो वानर बनला होता आणि ज्या ज्या ठिकाणी हे वानर वस्ती करतात त्या त्या ठिकाणी ती भूमी पाण्याने समृद्ध होते. तेथे वृक्षांची दाटी होते. तेथे फळे भरपूर येतात. वानरांना तसे रामाचे वरदानच आहे!”
“पूर्वी रामरावण युद्धात रामाचा विजय झाला. रामाने रावणाच्या बंदीतून सर्व देवांची सुटका केली. देव प्रसन्न झाले. त्या युद्धात मारल्या गेलेल्या वानरांवर देवांनी अमृत शिंपडले. मग सगळ्या वानरांना श्रीराम म्हणाले, “तुम्ही स्वामी कार्य केले. धन्य झालात. आता तुम्ही मनसोक्त विहार करा. जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे पुष्कळ झाडे असतील. भरपूर फळेही असतील. स्वच्छं सुंदर पाणी असेल आणि तुम्हांला रामाचे दास म्हणून लोक मान देतील!”
“म्हणून नारदा तो कदर्य वानर मृगतीर्थावर राहू लागला. त्याच्या वास्तव्यामुळे त्या परिसरात भरपूर फळे, दाट झाडी आणि स्वच्छ विपुल पाणी सतत असायचे!” “पण दैवगती विचित्रच असते. त्या ठिकाणी भरपूर फळे असल्यामुळे तो कदर्य वानर लोभी अधाशीच होता. खूप खाऊन खाऊन त्याच्या तोंडाला जखमा झाल्या. पोट फुगायचे, अंगावर ओरखडे उठायचे. खूप दुःख!”
“पुढे पुढे त्या वानराला खाताच येईना. तोंडातून रक्त-पू गळू लागला. खाणे नाही पिणे नाही. विश्रांती नाही. त्याला उठवेना. तो खूप अशक्त झाला. त्याचे मरण अगदी जवळ आले.”
“पुढे लौकरच अधिकमास आला. त्या पुण्यश्रेष्ठ महिन्यात कदर्य वानराला उपवास अनायासेच घडले. पश्चात्तापाने तो मनातल्या मनात जळत होता. विव्हळत होता. भगवान पुरुषोत्तमाला आळवीत होता. नाम जप करीत होता.”
“एके दिवशी त्या वानराला खूपच भूक लागली. त्या मृगतीर्थ तलावाकाठी एका झाडावरील फळे त्याने पाहिली. कसे तरी बळ एकवटून तो त्या झाडावर चढला. तलावाच्या पाण्यावर एका फांदीला खूप फळे लटकली होती. ती फळे घेण्यासाठी कदर्य वानर हळूहळू त्या फांदीवर गेला आणि ती फळे तोडीत असतानाच त्याचा तोल गेला. धाडकन तो त्या तलावात पडला.”
“गटांगळ्या खात, धडपडत तो कसातरी काठाकडे आला; पण त्याला बाहेर येताच येईना. मग तो त्या पाण्यात ताटकळत तसाच उभा राहिला. उठायचा पुनः पडायचा. दशमीपासून अमावास्येपर्यंत सतत पाच दिवस तो वानर त्या पाण्यात उपाशी उभा होता. अखेर शेवटी तो तेथेच त्याच स्थितीत मरण पावला.”
“तेवढ्यात काय नवल! नारदा, अरे त्या वानराचा देह जरी पडला तरी त्याच्या प्राणज्योतीला-आत्म्याला एक प्रकारचे दिव्य स्वरूप प्राप्त झाले. गोलोकातून त्याला विमान आले आणि भगवान पुरुषोत्तमाच्या दतांनी त्याला मोठ्या सन्मानाने थेट गोलोकात नेले.”
त्या कदर्याला खूपच आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. हरीदूत म्हणाले, “हे कपि आत्म्या, या अधिकमासात तू जे निराहार उपवास व्रत केलेस आणि सतत पाच दिवस थंड पाण्याने अखंड स्नान केलेस. त्या तपाच्या पुण्याईमुळे तुला आता मुक्ती मिळाली आहे. गोलोकात भगवान पुरुषोत्तमाजवळ तुला आता कायमचा निवास लाभणार आहे.
तू कृतकृत्य झालास!”
नारायण म्हणाले, “नारदा, तो कदर्य अति पापी होता आणि वानर योनीत होता तरी अधिकमास व्रत पुण्याईमुळे त्याचा उद्धार झाला. आता पुढील अध्याय शेवटचा एकतिसावा त्यात तुला मी अधिकमास माहात्म्य’ ग्रंथाचा थोडक्यात सारांश सांगतो. तो ऐकावा.