अध्याय २१ – धर्म शर्माची कथा Adhikmas mahatmya
अध्याय २१ – धर्म शर्माची कथा Adhikmas mahatmya
वाल्मिकी मुनी दृढधन्वा राजाला म्हणाले, “हे राजा, स्मितविलासिनी अप्सरेची कथा श्रीविष्णूंनी लक्ष्मीदेवीला सांगितल्यावर लक्ष्मीदेवी म्हणाली, “भगवंता, आता मला
कथाही सांगा!” त्यावर विष्णू म्हणाले,
“प्रिये, या पुरुषोत्तम महिन्यातील स्नानाचे पुण्य अगदीच मोठे आहे. या महिन्यात महिनाभर दररोज नित्य विधीपूर्वक स्नान करणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात. या महिन्यातील स्नानामुळे सर्व देव प्रसन्न होतात. जरी हे स्नान घरी केले तरी सकल तीर्थांच्या स्नानांचे पुण्य मिळते. बारा महिन्यांच्या पर्वकाळ स्नानांचे पुण्य लाभते.
शक्य असेल त्याने गंगास्नान, प्रयाग संगमस्नान, सरस्वती, गोदावरी, नर्मदा वगैरे नद्यांवर स्नान करावे. अथवा घरी स्नान करताना
तीर्थस्नानाचे फळ प्राप्त होते. आणि नित्य नवे तेज प्राप्त होते. आरोग्य लाभते.
अधिकमासातील स्नानामुळे देवांना देवत्व प्राप्त झाले. ऋषिमुनी तापसी व पवित्र बनले. अनेक पाप्यांचा उद्धार झाला. आणि अनेकांना
मुक्ती मिळाली.
लक्ष्मी म्हणाली, “वैकुंठनाथा, ज्या लोकांना हे अधिकमासातील स्नान महिनाभर सतत करणे अगदीच अशक्य असेल त्यांनी एक दिवस * जरी विधीपूर्वक स्नान करून यथाशक्ती दानधर्म केला तरी त्यांना हे पुण्य…”
भगवान विष्णु हसून म्हणाले, “प्रिये, या थोर पुरुषोत्तम महिन्यात एक दिवस जरी विधीयुक्त स्नान करून यथाशक्ती दानधर्म केला तरी त्याला पुण्य हे मिळणारच; परंतु अशा लोकांनी निदान सलग तीन दिवस विधीयुक्त स्नान करावे. अशा त्रिदिन स्नानाचे फळ विशेष मिळते. याविषयी तुला एक कथाच सांगतो ती ऐक!” मग लक्ष्मीदेवी ती कथा शांतपणे ऐकू लागली..
गोदावरी नदीच्या काठी पैठण नावाची नगरी आहे. त्या पवित्र क्षेत्रात पूर्वी धर्मशर्मा नावाचा एक पंडित राहात होता. तो अत्यंत नेमनिष्ठेने स्वधर्माचरण पाळीत होता. अधिकमासात तर तो पुरुषोत्तमाप्रीत्यर्थ सर्व प्रकारची व्रते, दाने करीत असायचा. त्याला तसे वैभवही मिळाले होते!
असे अनेक अधिकमास त्याने पाळले होते; परंतु पुढे तो म्हातारा झाला. त्याच्या अंगात शक्तीच राहिली नाही. अशावेळी पुन: एक अधिकमास आला. यातील व्रते, दाने करण्यास तो असमर्थ होता. तरी पण त्याने विचार केला, की या अधिकमासात काही नाही तरी निदान तीन दिवस गंगास्नान मी करणारच ! त्याचा तो दृढ संकल्पच झाला.
मग एके दिवशी तो अगदी भल्या पहाटे उठला आणि कसा तरी हखडत रखडत गोदावरीवर गेला. तेथे त्याने स्नान केले. त्यामुळे त्याला एक प्रकारे नवा उत्साह प्राप्त झाला. सत्य संकल्पाचा दाता भगवंत असतोच! मग दुसरे दिवशीही त्याने तसेच स्नान आटोपले. अखेर तिसऱ्या
दिवशीही तो गंगेवर गेला. स्नान केले आणि परत घरी येण्यास निघाला तोच काय नवल! अगदी भल्या पहाटेच्या त्या अंधार उजेडात धर्मशर्मापुढे एक भयंकर भूत येऊन उभे राहिले.
इंगळासारखे लाललाल विचित्र असे डोळे, अचकट विचकट दात दाढा, केस पिंजारलेले, शरीराचा तो हाडांचा सापळा, किंकाळ्यांचे ते आवाज. बापरे ! अशी ती विचित्र भयंकर आकृती पाहून तो धर्मशर्मा जागेवरच आ करुन उभा राहिला.
धर्मशर्मा धीर धरुन धीटपणाने त्या भूताला म्हणाला, “अरे तू असा भयानक अवताराचा आहेस तरी कोण? आणि आज तू असा माझ्यापुढे येऊन जो उभा राहिलास त्याचे कारण तरी काय? मी तुला मुळीच भीत नाही. कारण माझ्या पाठीशी अधिकमासातील व्रत दानांची पुण्याई आहे! तेव्हा… तू तू?”
“तेच… तेच… मी तुला मागायला आलो आहे! मला ती तुझी अधिकमासातील थोडी तरी पुण्याई आज अर्पण केलीस तर माझा उद्धार होणार आहे. नाही पेक्षा मी… मी… ह्या किळसवाण्याभूतयोनीत कायमचा… खितपत राहणार आणि स्मशानात राहन लोकांना त्रास देत राहणार! मला या योनीचा आता कंटाळा आला आहे! तू इथे गेले तीन दिवस भल्या पहाटेस स्नान केलेस आणि तू परत जाताना मी ते पाहिले म्हणून हे पुण्यपुरुषा, तुझे थोडे तरी पुण्य मलादे! माझ्यावर दया कर, माझा उद्धार कर!”
त्या भूताचे ते लांबलचक गा-हाणे ऐकून तो धर्मशर्मा चकित झाला. तरी सुद्धा त्याने त्या भुताला पुनः विचारले, “बाबारे, तुला ही अशी भूतप्रेत योनी का बरे मिळाली? तू पूर्वी कोण होतास आणि…”
“ते मी तुला आता सांगून उपयोग काय? मी पूर्वजन्मी अत्यंत वाईट माणूस होतो. नाही नाही ती पापे मी केली. शेवटी मरणानंतर अनेक यमयातना भोगल्या. त्या नरकातून मला आता या भूतयोनीत येऊन हे असे फिरावे लागते! तर हे धर्मात्मा, आज तू माझा उद्धार |
| कर! तुझे थोडे तरी पुण्य मला दान कर!”
भूताच्या त्या विनंतीमुळे धर्मशाला त्याची दया आली आणि लगेच त्याने आपल्या कमंडलूतील गंगाजळ हाती घेऊन त्या भूताच्या हातावर सोडले. ते दान करताना धर्मशर्मा म्हणाला, “मी अधिकमासात हे जे त्रिदिन स्नान केलेले आहे याचे पुण्य मी तुला दान दिले आहे! घे हे!”.
आणि काय आश्चर्य! ते पाणी हातावर पडताच त्या भूताचे रुप एकदम पालटले. तो एक दिव्य पुरुष झाला. त्याने धर्मशर्माला वंदन केले आणि तो स्वर्गात गेला. । भगवान विष्णु म्हणाले, “लक्ष्मी या भूताच्या उद्धारासारखी
आणखी एक कथा तुला सांगतो ती कथा पुढे बाविसाव्या अध्यायात ऐकावी!”
अध्याय २१ – धर्म शर्माची कथा
(धर्म शर्माची कथा) adhikmas mahatmay adhyay 1-11